गावाविषयी माहिती
पंचकेश्वर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रभु श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.पंचकेश्वर गावात पुर्वमुखी हनुमान मंदिर व पंचमुखी महादेव मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १८४० आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०१५ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत पंचकेश्वर ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असुन गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. तसेच १०मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असुन ऊस, द्राक्ष, कांदा, टोमॅटो,गहू, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष, ऊस, कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. तसेच काही शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात.
पंचकेश्वर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुलचा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंचकेश्वर गावाने संपुर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १० सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवुन आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
पंचकेश्वर गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
पंचकेश्वर हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ९ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकुण क्षेत्रफळ ४९२ हे आर असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण ३१८ कुटुंबे येथे वास्तव्यास असुन, लोकसंख्या १८४० आहे. त्यामध्ये ९३६ पुरुष व ९०४ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असुन शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गावालगत अवघ्या १.५ किमी अंतरावर पालखेड डावा कालवा असुन रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
पंचकेश्वर गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.
लोकजीवन
पंचकेश्वर गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा सप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पुजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव: या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसुन येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
पंचकेश्वर च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
संस्कृती व परंपरा
पंचकेश्वर गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक,श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच गावात पुर्वमुखी पंचमुखी महादेव यात्रा हि गुडीपाडवाला मोठ्या उत्साहात २ दिवस भरवली जाते. त्यात प्रामुख्याने कावड रथ मिरवणूक हे आकर्षण आहे , गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व सप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे पंचकेश्वर गावाचे लोकजीवन, परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकुन आहे.
प्रेक्षणीय स्थळे
पंचमुखी महादेव मंदिर – गावातील प्रमुख जागृत पुर्वमुखी महादेव व मारुती मंदिर गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरमहिन्याला प्रदोष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
शेती क्षेत्र व द्राक्षबागा – पंचकेश्वर द्राक्ष उस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे.
जवळची गावे
पंचकेश्वर गाव निफाड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे पंचकेश्वरशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
दावचवाडी,देवपुर,नादुर्डी,रानवड,कुंभारी हि गावे पंचकेश्वरच्या आसपासची प्रमुख गावे आहेत.